Breaking News

पत्रलेखनासारख्या अभिनव उपक्रमातून विद्यार्थ्यांनी पालकांना केले मतदानाचे आवाहन

पत्रलेखनासारख्या अभिनव उपक्रमातून विद्यार्थ्यांनी पालकांना केले मतदानाचे आवाहन

संविधानाने दिलेला मतदानाचा अधिकार प्रत्येक नागरिकाने 20 मे रोजी होत असलेल्या ठाणे लोकसभा निवडणूकीत हक्काने बजावावा याकरिता विविध माध्यमांतून जनजागृती करण्यात येत असून मतदानविषयक प्रचार, प्रसाराच्या स्वीप कार्यक्रमांतर्गत 150 ऐरोली व 151 बेलापूर विधानसभा मतदारसंघ कार्यालयाच्या वतीने वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत आहेत.

लोकसभा निवडणूकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी विविध माध्यमांतून प्रयत्न करण्यात येत असून मुलांनी मागणी केलेल्या एखाद्या गोष्टीला पालकांकडून उत्तम प्रतिसाद मिळतो हे लक्षात घेत पत्रलेखन हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. याव्दारे विद्यार्थ्यांनी आपले आई-बाबा यांना पत्र लिहून त्यांनी येत्या लोकसभा निवडणूकीत संविधानाने दिलेला मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन केले. नवी मुंबई महानगरपालिका शाळांप्रमाणेच  खाजगी शाळांतून हा उपक्रम उत्साहाने राबविण्यात आला. अनेक शाळांनी त्याकरिता आपल्या विद्यार्थ्यांना पोस्टकार्ड, अंतर्देशीय पत्र उपलब्ध करून दिली होती.

माझ्या उज्ज्वल भविष्यासाठीलोकशाही बळकट करण्यासाठी नक्की मतदान करा’ असा आईबाबांना आग्रह करणारे हे पत्रलेखन मुलांकडून आपल्या पालकांना त्यांच्या मतदानाच्या अधिकाराची जाणीव करून देणारे होते. या पत्रलेखनातून मुलांमार्फत मतदार पालकांना आवाहन तर करण्यात आलेच शिवाय सध्याच्या समाज माध्यमांतून संदेश आदानप्रदानाच्या तंत्रस्नेही युगात पत्रलेखनासारख्या दुर्मीळ होत चाललेल्या माध्यमाचा आनंदही याव्दारे विद्यार्थ्यांना घेता आला. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अतिशय आनंदाने पालकांनी मतदान करावे असे आवाहनपत्र लिहिले व पालकांनीही या पत्रलेखन उपक्रमाचे भरभरून कौतुक केले.

महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिकेच्या शाळांसह खाजगी शाळांमध्येही शिक्षण विभागाच्या नियंत्रणाखाली या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.


Most Popular News of this Week