Breaking News

‘हेल्थ हिरो’ होण्यासाठी फेसबुक लाईव्ह, हजारो विदयार्थ्यांचा सहभाग

‘हेल्थ हिरो’ होण्यासाठी फेसबुक लाईव्ह, हजारो विदयार्थ्यांचा सहभाग

नवी मुंबई :- ’स्वच्छ सर्वेक्षण 2024’ मध्ये ’स्वच्छ भारत मिशन’च्या वतीने ’सफाई अपनाओ – बिमारी भगाओ’ हे अभियान 1 जुलै ते 31 ऑगस्ट या कालावधीत राबविण्यात येत असून नमुंमपा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता व आरोग्याशी संबंधित विविध उपक्रम लोकसहभागातून राबविण्यात येत आहेत.अशाच प्रकारचा फेसबुक लाईव्हव्दारे शालेय विदयार्थ्यांसोबत सुसंवादात्मक उपक्रम ऑनलाईन राबविण्यात आला, ज्यामध्ये नवी मुंबईतील महानगरपालिकेच्या व खाजगी शाळांतील हजारो विदयार्थ्यांनी सहभागी होत ज्येष्ठ बालरोग तज्ज्ञ डॉ.माधवी इंगळे यांच्याकडून स्वच्छता तसेच आरोग्य जपणूकीविषयी मौलिक मार्गदर्शनाचा लाभ घेतला.
             महापालिका मुख्यालयातील ज्ञानकेंद्रात उपस्थित काही शाळांच्या विदयार्थ्यांसमोर संपन्न झालेला ’हेल्थ हिरो होऊया – आपले आरोग्य जपूया’ हा सुसंवादात्मक उपक्रम नवी मुंबईतील अनेक शाळांतील विदयार्थ्यांनी ऑनलाईन उपस्थित राहत अनुभवला. याप्रसंगी ज्ञानकेंद्रात शिक्षण विभागाच्या उपआयुक्त संघरत्ना खिल्लारे, वैदयकिय आरोग्य अधिकारी डॉ.प्रशांत जवादे, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ.अजय गडदे, शिक्षणाधिकारी अरुणा यादव तसेच इतर अधिकारी, शिक्षक उपस्थित होते.’हेल्थ हिरो होऊया – आपले आरोग्य जपूया’ या शिर्षकांतर्गत संपन्न झालेल्या या फेसबुक लाईव्ह सुसंवाद उपक्रमात बालरोगतज्ज्ञ डॉ.माधवी इंगळे यांनी विदयार्थ्यांशी दिलखुलास संवाद साधत त्यांना अगदी सोप्या शब्दात स्वच्छतेचा आरोग्याशी असलेला परस्पर संबंध सांगून पावसाळी कालावधीत घ्यावयाची काळजी व आपले वर्तन याविषयी उपयोगी माहिती दिली.पावसाळा कालावधीतील जलजन्य आणि किटकजन्य आजारांची नावे व त्यांची आढळणारी लक्षणे याची माहिती विदयार्थ्यांकडूनच वदवून घेत सुसंवादाची सुरुवात करीत डॉ.माधवी इंगळे यांनी स्वच्छता ही आरोग्याशी निगडीत बाब असल्याचे स्पष्ट करीत कोणत्याही बदलाची सुरुवात स्वत:पासून करायला हवी हे निक्षून सांगितले. हात धुण्याची चांगली सवय अपल्याला नियमित असावी हे सांगतानाच आजार होऊ नये म्हणून घ्यावयाची काळजी तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि आजार झाल्यास करावयाचे योग्य उपचार याविषयी त्यांनी विस्तृत माहिती दिली.पावसाळा कालावधीत पाणी उकळून व गाळून प्यावे, उघडयावरचे पदार्थ खाऊ नयेत, भाज्या/फळे धुवून घ्यावीत, बरे वाटत नाही असे वाटल्यास वैदयकिय सल्ला घ्यावा अशा महत्तवपूर्ण सूचना त्यांनी केल्या. आजारी पडणे ही अभिमानाची गोष्ट नाही हे सांगत डॉ.माधवी इंगळे यांनी ज्याचे इतरांना अनुकरण करावेसे वाटेल असे ’हेल्थ हिरो’ आपल्याला व्हायचे आहे अशी विद्यार्थ्यांमध्ये निर्माण केली.’स्वच्छता म्हणजे रोजचा सण, नाहीतर कायमचे आजारपण’ असे सांगत डॉ.माधवी इंगळे यांनी व्यक्तिगत स्वच्छतेप्रमाणेच आपले घर व परिसर स्वच्छतेलाही महत्व दिले पाहिजे हे स्पष्ट केले. तसेच आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी सकस व संतुलित आहार आणि नियमित व्यायाम यांचेही महत्व विविध उदाहरणे देत सांगितले. शरीराप्रमाणेच मनाचे आरोग्यही महत्वाचे असल्याचे त्या म्हणाल्या.आजच्या सुसंवादात सांगितलेल्या स्वच्छता व आरोग्य विषयक महत्वाच्या गोष्टी या केवळ अभियानापुरत्या मर्यादित नाहीत, तर त्या नियमित आचरणात आणून आरोग्यपूर्ण जीवन जगले पाहिजे व याव्दारे आपल्या नवी मुंबई शहराचे नाव रोल मॉडेल म्हणून ओळखले गेले पाहिजे असेही त्यांनी सांगितले. नवी मुंबईतील प्रत्येक विदयार्थी, विदयार्थिनी ’हेल्थ हिरो’ होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. याप्रसंगी प्रास्ताविकपर मनोगतात शिक्षण विभागाच्या उपआयुक्त संघरत्ना खिल्लारे यांनी महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या हेल्थ हिरो सुसंवादात्मक उपक्रमाचे उद्दिष्ट सांगितले व यातून प्रेरणा घेऊन नवी मुंबईतील विदयार्थी आपल्या शहराच्या स्वच्छता व आरोग्य जपणूकीसाठी जागरूक राहतील असा विश्वास व्यक्त केला. 

Most Popular News of this Week