Breaking News

शहीद अग्निशमन जवानांना आदरांजली

शहीद अग्निशमन जवानांना आदरांजली

नवी मुंबई :- अग्निविमचनाचे काम करीत असताना आपल्या प्राणांचे बलिदान करणाऱ्या शहीदांचा सन्मान ठेवणे हे आपले कर्तव्य असून त्यांच्या स्मृतींपासून अधिक चांगले काम करण्याची ऊर्जा मिळते असे सांगत नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी शहीद‌ अग्निशमन जवानांच्या  स्मृतीस्तंभास पुष्पचक्र अर्पण करीत भावपूर्ण आदरांजली दिली. नवी मुंबई महानगरपालिका अग्निशमन दलाच्या वतीने वाशी अग्निशमन केंद्रात अग्निशमन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाप्रसंगी आयुक्तांनी उपस्थित अग्निशमन जवानांशी संवाद साधला.
             नवी मुंबई महानगरपालिकेच्या 5 अग्निशमन केंद्राद्वारे शहर सुरक्षिततेची जबाबदारी आपले अग्निशमन दल पार पाडत असून आपत्तीनंतर आपत्ती निवारणाचे कार्य करण्यासोबतच आपत्ती उद्भवूच नये याकरिता नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करणारे उपक्रम राबविण्यावर भर द्यावा असे आयुक्तांनी यावेळी सूचित केले. मागील वर्षी पावसाळी कालावधीत इरशाळवाडी येथे आपत्तीप्रसंगी मदतकार्य करताना वीरगती प्राप्त झालेले नवी मुंबई महानगरपालिकेचे सहा. अग्निशमन केंद्र अधिकारी शिवराम ढुमणे यांच्याही सेवाभावी समर्पित कार्याचे स्मरण याप्रसंगी आयुक्तांनी केले.यावेळी आयुक्तांप्रमाणेच उपस्थित अतिरिक्त आयुक्त सुनील पवार तसेच अतिरिक्त आयुक्त तथा मुख्य अग्निशमन अधिकारी शिरीष आरदवाड, शहर अभियंता संजय देसाई, उप मुख्य अग्निशमन अधिकारी पुरुषोत्तम जाधव, वाशी विभागाचे सहाय्यक आयुक्त सागर मोरे, कार्यकारी अभियंता अजय संख्ये, अग्निशमन केंद्र अधिकारी जे टी पाटील व जी एस सुसवीरकर आणि इतर अग्निशमन अधिकारी यांनी शहीद वीरांच्या स्मृतिस्तंभास पुष्पचक्र अर्पण करून भावपूर्ण अभिवादन केले.14 एप्रिल 1944 रोजी मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये एस एस फोर्ट स्टिकीन या जहाजाला लागलेल्या आगीत मुंबई अग्निशमन दलातील 66 जवानांनी स्वतःच्या प्राणांची आहुती देऊन अग्निविमोचनाचे कार्य केले. या शहीद जवानांना तसेच त्यानंतरही अग्नीविमोचनाचे कार्य करताना आपल्या प्राणांचे बलिदान दिलेल्या शहीद जवानांना भावपूर्ण अभिवादन करीत 14 एप्रिल हा दिवस अग्निशमन सेवा दिन म्हणून पालन करण्यात येतो.या दिनाचे औचित्य साधून 14 ते 20 एप्रिल 2024 या कालावधीत संपूर्ण नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात अग्निशमन सेवा सप्ताह साजरा करण्यात येत असून या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रातील मॉल्स, मोठ्या सोसायट्या, हॉस्पिटल्स, शाळा - महाविद्यालये, हॉटेल्स, रेल्वे स्टेशन अशा ठिकाणी अग्निसुरक्षतेच्या दृष्टिकोनातून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे तसेच विविध ठिकाणी मॉकड्रिलचे आयोजन करण्यात आले आहे


Most Popular News of this Week