Breaking News

विद्यार्थ्यांची रॅलीव्दारे नवी मुंबईत मतदानाविषयी जनजागृती

विद्यार्थ्यांची रॅलीव्दारे नवी मुंबईत मतदानाविषयी जनजागृती

सार्वत्रिक लोकसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा याकरिता 150 - ऐरोली विधानसभा मतदारसंघ कार्यालय व 151 - बेलापूर विधानसभा मतदारसंघ कार्यालय यांच्यामार्फत मोठ्या प्रमाणात ‘स्वीप’ कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत विविध शाळा, महाविद्यालये यामध्येही मतदानविषयक जनजागृती करणारे वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत आहेत.

या उपक्रमांमध्ये महानगरपालिकेच्या शाळांसह खाजगी शाळा, महाविद्यालये यांच्या विद्यार्थ्यांचा सहभाग घेतला जात आहे. अनेक नागरिकांपर्यंत एकाच वेळी पोहचणारा रॅलीसारखा उपक्रम मोठ्या प्रमाणावर राबविला जात जात असून शाळांमार्फत आपापल्या शालेय परिसरात प्रभातफेरी काढली जात आहे.

‘लोकशाहीचा बाळगू अभिमान – चला करुया हक्काचे मतदान’, ‘मी मतदान करणार – आपल्या देशाचे भविष्य घडवणार’ अशा स्वरुपाच्या घोषणा देत मतदान विषयक संदेश देणारे फलक उंचावत विद्यार्थी अत्यंत उत्साहाने रॅलीत सहभागी होत असून मतदानाचे महत्त्व पटवून देत आहेत. तसेच मतदान करण्याविषयी आवाहन करीत आहेत.

150 व 151 या दोन्ही विधानसभा मतदारसंघ निवडणूक कार्यालयामार्फत राबविण्यात येणा-या 25 ठाणे लोकसभा निवडणूकीच्या स्वीप कार्यक्रमात महापलिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शानानुसार नवी मुंबई महानगरपालिकेच्या सर्व 80 शाळांचा संपूर्ण सहभाग लाभला असून महानगरपालिकेच्या शिक्षण विभागामार्फत खाजगी शाळांनीही यामध्ये सहभागी होण्याकरिता कार्यवाही करण्यात आलेली आहे. खाजगी शाळा, महाविद्यालयांचाही यामध्ये उत्तम सहभाग लाभत आहे. 20 मे रोजी होणा-या ठाणे लोकसभा निवडणूकीत मतदानांची टक्केवारी वाढण्यासाठी सर्वत्र व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे.


Most Popular News of this Week