Breaking News

विविध प्राधिकरणांनी पावसाळा कालावधीत परस्पर समन्वयाने काम करण्याचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांचे निर्देश

विविध प्राधिकरणांनी पावसाळा कालावधीत परस्पर समन्वयाने काम करण्याचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांचे निर्देश

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात विविध प्राधिकरणे कार्यरत असून या सर्वांनी परस्पर समन्वय राखून पावसाळा कालावधीत काम करावे व नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी असे सूचित करीत नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी महानगरपालिकेसह इतर सर्व प्राधिकरणांनी पावसाळ्यात सतर्क रहावे असे निर्देशित केले. शहर आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष म्हणून आयुक्तांनी समितीच्या विशेष बैठकीत सर्व प्राधिकरणांच्या उपस्थित प्रतिनिधींशी संवाद साधत त्यांनी केलेल्या पावसाळा पूर्वतयारीचा आढावा घेतला तसेच त्यांच्या अडचणी जाणून घेऊन त्यावर तोडगाही काढला.

याप्रसंगी नवी मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त तथा समितीचे सदस्य सचिव श्री. सुनील पवार, अतिरिक्त आयुक्त श्री. शिरीष आरदवाड, शहर अभियंता श्री. संजय देसाई, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त श्री. चंद्रकांत तायडे तसेच विभागप्रमुख, विभाग अधिकारी, कार्यकारी अभियंता हे प्रत्यक्ष विशेष समिती सभागृहात तसेच सिडको, एमआयडीसी, एमएमआरडीए, पीडब्ल्यूडी, नवी मुंबई पोलीस व वाहतुक पोलीस, एपीएमसी, रेल्वे, महावितरण, एमटीएनएल, मोबाईल प्रोव्हायडर, एपीएमसी, आरएएफ, नागरी संरक्षण दल, महानगर गॅस लिमी., टीबीआयए, मच्छीमार संघटना आदी विविध प्राधिकरणांचे अधिकारी दूरदृश्य प्रणालीव्दारे ऑनलाईन उपस्थित होते.

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्र समुद्रसपाटीपासून खाली वसलेले असल्याने अतिवृष्टी आणि मोठ्या उधाण भरतीची वेळ जुळून आल्यास काही सखल भागात पाणी साचते. अशा साधारणत: 14 ठिकाणांची माहिती असून त्याठिकाणी पाणी उपसा पंपांची आवश्यक त्या प्रमाणात आत्ताच तजवीज करून ठेवण्याचे आयुक्तांनी निर्देशित केले.

      यावर्षी साधारणत: 10 जून पासून पावसाला सुरूवात होईल असा हवामान खात्याचा अंदाज असून अंतिम टप्प्यात असलेली नालेसफाईची कामे त्वरित पूर्ण करून घ्यावीत असे निर्देश देण्यात आले.

विशेषत्वाने एमीएमसी मार्केटमधील नाले व गटारे सफाईची कामे तत्परतेने पूर्ण करून घ्यावीत अशा सूचना करण्यात आल्या. पावसाळा कालावधीत भाजीपाला, फळे यांच्या कच-याची योग्य रितीने विल्हेवाट लागेल याची विशेष काळजी घ्यावी व पदपथावर विक्रीस परवानगी देऊ नये असे निर्देशित करण्यात आले.  

      रेल्वे प्लॅटफॉर्म, रूळ तसेच रूळांच्या बाजूला असलेले नाले यांची सफाई लगेचच पूर्ण करावी त्याचप्रमाणे रेल्वेचे अंडरपास व सबवेही स्वच्छ करून घ्यावेत तसेच रेल्वेची उद्घोषणा प्रणाली तपासून घ्यावी अशा सूचना सिडको आणि रेल्वे प्रशासनास करण्यात आल्या. रेल्वे हद्दीत लागलेल्या होर्डींगचे संरचनात्मक लेखापरीक्षण तातडीने करून घ्यावे असे सूचित करतानाच होर्डींगला स्थानिक नियोजन प्राधिकरणाची परवानगी घ्यायला हवी अशाही सूचना आयुक्तांनी केल्या.

      एमआयडीसी क्षेत्रातील नालेसफाईवर संबंधित विभाग अधिकारी यांनी प्रत्यक्ष पाहणी करून लक्ष द्यावे व ती पूर्ण करून घ्यावी असे निर्देशित करण्यासोबतच आयुक्तांनी एमआयडीसी क्षेत्रात रस्त्याच्या कडेला पडलेले डेब्रीज ड्रेनेजमध्ये येऊन पाणी तुंबण्याची घटना घडणार नाही याकडे प्राधिकरणाने लक्ष द्यावे असे सूचित केले. नवी मुंबईतील डेब्रीज पडण्याच्या संभाव्य स्थळांवर सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्याचे नियोजन करावे अशाही सूचना आयुक्तांनी दिल्या.  

      यावेळी पोलीस विभाग तसेच वाहतुक पोलीस विभाग यांनी केलेल्या सूचनांच्या अनुषंगाने वाहतुक सुरळीत राहण्याच्या दृष्टीने आवश्यक काळजी घेणेबाबत आयुक्तांनी अभियांत्रिकी विभागास सूचना केल्या.

      कालच दिघा व ऐरोली विभागातील नालेसफाईची प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर दिलेल्या सूचनांची सर्वच विभाग अधिकारी यांनी अंमलबजावणी करावी व तातडीने नालेसफाई पूर्ण करून घ्यावी असे निर्देश आयुक्तांनी यावेळी देत प्रत्येक ठिकाणी विभाग अधिकारी यांनी स्वत: भेट देत प्रत्यक्ष पाहणी करावी व काम झाल्याची खातरजमा करून घ्यावी असे निर्देश दिले.

      या सर्व कामांवर त्रयस्थ परीक्षण असावे यादृष्टीने आठही विभागांसाठी नोडल अधिकारी म्हणून नेमलेल्या विभागप्रमुख दर्जाच्या अधिका-यांसोबत 3 अधिकारी, कर्मचारी देऊन या पथकाने नेमून दिलेल्या विभागातील नाले व गटार सफाई, स्वच्छता, रस्त्यांची स्थिती अशा बाबींची काटेकोर तपासणी करून कामे व्यवस्थित झाल्याची खात्री करून घ्यावी आणि तशा प्रकारचा अहवाल द्यावा असे आयुक्तांमार्फत निर्देशित करण्यात आले.

      नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात विविध प्राधिकरणे असून त्यांनी परस्पर समन्वय राखून पावसाळा कालावधीत काम करावे व महानगरपालिका मुख्यालयातील तात्काळ कृती केंद्राशी संपर्कात राहून काम करावे अशा सूचना नमुंमपा आयुक्त तथा शहर आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉ.कैलास शिंदे यांनी देत नागरिकांनी अडचणीच्या प्रसंगी 27567060 / 27567061 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन केले आहे. 


Most Popular News of this Week