Breaking News

ऐरोली व बेलापूर विधानसभा निवडणुकीसाठी रस्सीखेच

ऐरोली व बेलापूर विधानसभा निवडणुकीसाठी रस्सीखेच

नवी मुंबई (योगेश महाजन) :- लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला उत्तम यश मिळाल्याने राज्यात विधानसभा निवडणूक पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी ताकदीने मैदानात उतरली आहे.त्याचवेळी महायुतीनेही कंबर कसली असून प्रत्येक मतदार संघात इच्छुक उमेदवारांची संख्या वाढली आहे.नवी मुंबईतील ऐरोली व बेलापूर मतदार संघात ताई व दादा यांची प्रतिष्ठा पणाला लागली असून इतर उमेद्वारांनीही निवडणुकीची तयारी सुरु केली आहे.महायुती व महाविकास आघाडीच्या माध्यमातून उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात पडणार हे अधिकृतरित्या येत्या काही दिवसात स्पष्ट होणार असले तरी तयारी मात्र सर्वच राजकीय पक्षांनी सुरु केली आहे.
                बेलापूर विधानसभा उमेदवारी वरून भाजपातील मंदा म्हात्रे आणि संदीप नाईक यांच्यात संघर्ष होण्याची शक्यता आहे.भाजप नवी मुंबईचे जिल्हा अध्यक्ष आणि माजी आमदार संदीप नाईक यांनी सीबीडी येथे जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन करून राजकीय वातावरण तापवले आहे. ऐरोली विधानसभेत आमदार राहिलेल्या संदीप नाईक यांनी बेलापूर विधानसभेत जनसंपर्क कार्यालय उघडून आपण उमेदवारीच्या स्पर्धेत असल्याचे संकेत दिले आहेत. सध्या बेलापूर विधानसभेत भाजपाकडून मंदा म्हात्रे विद्यमान आमदार आहेत. मात्र यानंतरही गेल्या काही दिवसापासून याच मतदारसंघात संदीप नाईक यांनी कार्यक्रमांचा धडाका लावून एक प्रकारे प्रचाराची सुरुवात केली आहे. संदीप नाईक हेच बेलापूर विधानसभेतील उमेदवार असतील अशा पोस्ट त्यांचे कार्यकर्ते सोशल मिडीयातून व्हायरल करीत असल्याने नाईक विरूध्द म्हात्रे असा संघर्ष अटळ झाला आहे.त्याचवेळी शिवसेना उपनेते विजय नाहटा यांनीही विजय नाहटा फाउंडेशनच्या माध्यमातून बेलापूर मतदार संघात कामाचा धडाका लावल्याने जर हा मतदार संघ भाजपला गेला तर नाहटा हे अपक्ष म्हणून निवडणुक लढतील अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे.मंदा म्हात्रे या सध्या बेलापूर मतदार संघाच्या आमदार असून लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान त्यांनी बोलतांना स्पष्ट केले होते की यावेळी शेवट एकदा निवडून द्या.त्यामुळे त्यांचाही या मतदार संघावर दावा आहे.त्यामुळे पक्ष कोणाला तिकीट देणार हे वेळच ठरवणार आहे.याच मतदार संघावर आम्हीही इच्छुक असल्याचे शिवसेनेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाकडूनही तयारी करण्यात येत असून नवी मुंबई जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे नाव आघाडीवर आहे.मनसेकडून गजानन काळे हेही मैदानात असल्याचे सोशल मीडियावरून स्पष्ट होत आहे.ऐरोली मतदार संघात गणेश नाईक हे भाजपचे आमदार असून त्या मतदार संघावरही शिवसेनेकडून उमेदवार इच्छुक आहेत.काँग्रेस कडून अनिकेत म्हात्रे यांच्या नावाची चर्चा आहे.सध्या भाजपाचे नवी मुंबई जिल्हा अध्यक्षपदाची धुरा संभाळणारे संदीप नाईक हे या आधी ऐरोली विधानसभेतून दोन वेळा राष्ट्रवादी पक्षाकडून आमदार म्हणून निवडून गेले होते. यानंतर 2019 च्या विधानसभा निवडणूकीच्या तोंडवर गणेश नाईक परिवाराने शरद पवार यांची साथ सोडत भाजपात प्रवेश केला होता. नवी मुंबईतील ऐरोली विधानसभेतून संदीप नाईक आणि बेलापूर विधानसभेतून गणेश नाईक यांना उमेदवारी मिळेल अशी आशा नाईकांना होती. मात्र भाजपाने विद्यमान आमदार असलेल्या मंदा म्हात्रे यांना बेलापूर विधानसभेत दुसऱ्यांदा तिकिट देत गणेश नाईकांना डावलले होते. ऐरोलीतून संदीप नाईक यांची उमेदवारी कायम ठेवली होती. मात्र आपल्या जागी वडील गणेश नाईक यांनी लढावे असा आग्रह धरत संदीप नाईक यांनी आमदराकीची होणारी ‘ हॅट्रीक ‘ वर पाणी सोडले होते.यावेळी मात्र 2024 ला होणाऱ्या विधानसभा निवडणूकीसाठी संदीप नाईकांनी आमदारकीसाठी शड्डू ठोकला आहे. यासाठी मैदान निवडलय बेलापूर विधानसभा. बेलापूर विधानसभेत गेल्या काही दिवसापासून संदीप नाईक यांनी कार्यक्रमांचा धडाका लावला असून पक्षाचे जुने जाणत्या कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. भाजपाचे जनसंपर्क कार्यालय सीबीडी येथे सुरू केले आहे. सीबीडी येथे सर्वच शासकीय यंत्रणांचे मुख्य कार्यालये असल्याने पक्षातील कार्यकर्त्यांची कामे होण्यासाठी मदत मिळावी यासाठी सीबीडी येथे कार्यालय सुरू केल्याचे संदीप नाईक यांनी भाषणातून सांगितले. मी पक्षाचा जिल्हाध्यक्ष असून पक्षाच्या वाढीसाठी शहरात सर्वच भागात कार्यरत राहणे माझे कर्तव्य असल्याचेही यावेळी त्यांनी स्पष्ट केले आहे.संदीप नाईक यांनी बेलापूर विधानसभेबाबतच्या उमेदवारीवरून भाष्य करण्याचे टाळले असले तरी त्यांच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. सोशल मिडीयातून आक्रमक प्रचार करीत बेलापूर मधील आमदार संदीप नाईक असे संदेश व्हायरल केले जात आहेत. गणेश नाईकांनी मात्र याबाबत भाष्य करीत कोणत्या विधानसभेत कुणाला उमेदवारी द्यायचे हे वरिष्ठ ठरवतील असे पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे.

बेलापूरची राणी मीच : भाजपा आमदार मंदा म्हात्रे यांची टोलेबाजी

नवी मुंबई : बुद्धिबळ हा एका अर्थाने राजकारणी लोकांचा खेळ आहे. राजकारणामध्ये श्रेष्ठ असला तरी या बुद्धिबळाच्या खेळामध्ये राणीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. राणी सर्व घर फिरू शकते. बुद्धिबळाच्या खेळात जसं राणीला महत्त्व आहे तशी बेलापूर मतदारसंघाची राणी मीच आहे. इथे किती उंट घोडे आडवे आले तरी त्यांना पाडायची क्षमता माझ्यात आहे, अशी जोरदार टोलेबाजी भाजपाच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी जानेवारी महिन्यात झालेल्या एका कार्यक्रमात केली होती.जानेवारी महिन्यात झालेल्या बेलापूर विधानसभा मतदारसंघात बुद्धिबळ आणि कॅरम स्पर्धांच्या शुभारंभ प्रसंगी आमदार मंदा म्हात्रे यांनी जोरदार टोलेबाजी केली. बुद्धीचा विकास करणारा असा बुद्धिबळ खेळ आहे. या खेळाचा वेगळ्या अंगाने अभ्यास केला तर हा राजकारणी लोकांचाही खेळ आहे. राजकारणामध्ये राजा जरी श्रेष्ठ असला तरी बुद्धिबळात राणीला महत्त्व आहे. राणी ही सर्व घर फिरू शकते. आडवी तिरकी उभी असा संचार तिला करता येतो. मात्र राजाला या खेळात मर्यादा आहे. त्याला एकच पाऊल चालता येतं. या खेळात उंटाला घोड्यांना अगदी प्यादांना जेवढा अधिकार आहेत तेवढाही अधिकार राज्याला नाही. म्हणून या घराची श्रेष्ठ कोण आहे तर ती राणी आहे. अशाच प्रकारे बेलापूर मतदारसंघाची राणी मी आहे. तिला किती उंट घोडे आडवे आले त्यांना पाडायची क्षमता माझी आहे, अशा शब्दात मंदा म्हात्रे यांनी राजकीय विरोधकांना टोले लागवले.
------------------------------------------------------------
लोकसभा निवडणूक दरम्यान विजय नाहटा यांना ठाणे लोकसभा मतदार संघाची उमेदवारी देण्याची होती चर्चा
 
ठाणे लोकसभा निवडणुकीत कुठल्याही एका नेत्याला युतीतील सर्व पक्षीय सहमती मिळत नसल्याची चर्चा असतानाच शिवसेना उपनेते विजय नाहाटा यांचेही नाव चर्चेत आले होते.नाहाटा हे पूर्ण ठाणे जिल्ह्यात राजकीय नेते ते सामान्य जनता या सर्वांना परिचित आहेत. याच कारणाने शिवसेनेतील कार्यकर्तेही नाहाटांबाबत आग्रही आहेत.निवृत्त प्रशासकीय अधिकारी असलेले नाहटा यांनी यापूर्वी नवी मुंबई आयुक्त म्हणून केलेल्या कामाची दखल आजही नवी मुंबईतील नागरिक घेतात. मनपा आयुक्त कोकण आयुक्त ते मुख्यमंत्री स्वीय सहाय्यक अशा पदांवर त्यांनी काम केल्याने प्रशासकीय दांडगा अनुभव आणि त्याच बरोबर पकड आजही आहे.लोकसभा मतदारसंघात सर्वांना परिचित उमेदवाराची निवड व्हावी यावर महायुतीत एकविचार आहे. ठाणे शिवसेना शिंदे गटाकडे राहणार हे निश्चित झाले असल्याने तगड्या उमेदवाराची चाचपणी सुरू झाली.त्यावेळी नाहटा यांचे नाव पुढे आले होते.ठाणे जिल्ह्यात त्यांनी सनदी अधिकारी म्हणून काम केल्याने त्यांचा सामान्य नागरिकांशी थेट संबंध येत होता. शिवाय नवी मुंबई मनपात आयुक्त म्हणून काम करताना त्यांनी राबवलेले स्कुल व्हिजन, तलाव व्हिजन, गार्डन व्हिजन स्वच्छता व्हिजन हे एक आदर्श उपक्रम देशभरात नावाजले गेले. लोकाभिमुख काम करणारे आयुक्त अशीच त्यांची ओळख आहे. आपल्या कामाची छाप पाडलेले असल्याने त्यांना मतदार निश्चित पसंती देतील असा होरा आहे अशी प्रतिक्रिया शिवसेना शहर प्रमुख विजय माने यांनी दिली.तरीही त्यांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी नरेश म्हस्के यांना निवडून आणण्यात खारीचा वाटा उचलला,त्यामुळे यावेळी त्यांना बेलापूर मतदार संघातून उमेदवारी मिळायला हवी अशी अपेक्षा शिवसैनिकांना आहे.


Most Popular News of this Week